Friday, September 30, 2016

बीन्स बरीटो (मेक्सिकन इंडियन फ्यूजन)

पोळीच्या आत भात त्यात उसळ, सैलड हे सगळं भरलं तर कसं लागेल? पण यातून एक छान, चविष्ट, पौष्टिक पदार्थ तयार होतो.

 वेळ 10 मिनिटे,
साहित्य: फुलके, गालाजी राजमा मसाला,  उकडलेला राजमा, थोड़ा भात/ खिचड़ी, कांदा, टॉमेटो, साल्सा, ओलिव्ह, कॉर्न,
 Recipe: घरच्या पोळ्या, फुलके एकदम मोठ्या आकाराचे करायचे. मऊ शिजलेला राजमा कुसकरुन मैश करायचा. त्यात जीरा राइस, फ्राइड राइस, किंवा साधा भात, कांदा, टॉमेटो चिरून घालायचे. कॉर्न, ओलिव्हस् लेटयस असेल तर ते पण घालायचे. मेयोनीज, साल्सा, मीठ, मिरपूड़ घालून चविष्ट करायचे. पोळीच्या आत भरून रोल करायचा आणि तव्यावर गरम करून साल्सा किंवा हॉट सॉस बरोबर द्यायचा.
यासाठी लागलेले पदार्थ कणिक, गालाजी राजमा मसाला येथे सचित्र देत आहे. येथे असलेल्या नंबरवर फोन वा व्हॉट्सएपवर आपण संपर्क करू शकता.

भाकरीचा चंद्र


मला आठवतंय मी शाळेत असताना ३० एप्रिल ला रिझल्ट लागला की १ मे ला बाबा, आई , ताई कोणासोबत तरी जाऊन पुढल्या वर्षीची पुस्तकं खरेदी करायची. छान कव्हरं घालून तयार ठेवायची. आणि मग त्यातलं मराठीचं पुस्तक वाचायचं. त्यातल्या त्यात एखादी, चि. वि. जोशी, पु.ल. देशपांडे यांची गोष्ट,लेख वगैरे असेल तर फार अपूर्वाईने वाचली जायची. उपदेशपर लिखाण, संतवाणी, कविता फारसे कळायचे नाही नुसते वाचून. मला वाटते दहावी किंवा बारावीच्या पुस्तकात नारायण सुर्वे यांची एक कविता होती. दोन दिवस ... 
दोन दिवस दु:खात गेले, दोन दिवस वाट पहाण्यात गेले
हिशेब करतो आहे किती राहिलेत उन्हाळे
शेकडो वेळा तारे फुलले, रात्र धुंद झाली
भाकारीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बरबाद झाली.
त्या वयात ना 'उन्हाळे' शब्दातली प्रतीकात्मकता कळत  असे ना 'रात्र धुंद होणे' म्हणजे काय हे कळत असे. भाकरी मात्र लक्षात राहिली. मराठीच्या बाईनी गिरणी कामगारांच्या व्यथा आणि एका भाकरीला देखील महाग होणं प्रयासाने समजावलं होतं. आपली आर्थिक परिस्थिती उत्तम नसली तरी एवढी वाईट नाही याची चांगली जाणीव तेव्हा झाली. आणि पानात अन्न पडेल त्याला मोल आहे हे जाणवायला लागलं. पुढे कधी तरी भक्ती बर्वेनी सादर केलेली बहिणाई दूरदर्शनवर पाहिली. त्यांच्या कवितेशी झालेली ही पहिली ओळख. तेव्हा देखील लक्षात राहिली ती 'आधी हाताला चटके, मग मिळते भाकर.' खूप वर्षे या संदर्भाचा अर्थ कळत नसे. आमची आजी रोज दुपारची एक भाकरी तिच्यासाठी करायची पण कधी चटका लागतो असं म्हणाली नव्हती. त्यामुळे बहुतेक तव्यावर भाजताना चटका लागत असावा असे वाटत असे. पुष्कळ वर्षांनी एका मैत्रिणीने सांगितले गरम पाण्यात पीठ भिजवावं भाकरीचं. म्हणजे मस्त होतात गं भाकऱ्या. लग्न झाल्यावर सासूबाईनी सोलापूराहून शेंगा चटणी आणली होती. मग संध्याकाळी भाकरी करू रोज असं ठरवलं. सासूने अगदी बाजूला उभं राहून छान शिकवल्या भाकऱ्या. कालांतराने बंद झालं भाकरी करणं. इथे ठाण्यात अगदी सहज पोळी भाजी केंद्रात भाकऱ्या मिळतात हे त्याचं आणखी एक कारण. परदेशात गेल्यावर आठवण यायला लागली, परत प्रयोग सुरु केले पण जमेनात. भारतात आल्यावर एकदा सोम नावाच्या रेस्तोरांत गेले. तिकडे भाकरी पिठले खाल्लं आणि वाटलं की खूप महत्त्वाचं काही तरी मिस करतोय आयुष्यात! महिना दोन महिने अगदी नियमित दोन भाकऱ्या तरी दररोज करायला सुरुवात केली. बरेच युट्युब व्हिडिओ पाहून स्वत:ची पद्धत तयार केली.  आता खरोखर उत्तम जमायला लागलीय भाकरी. प्रत्येक भाकरी टम्म फुगली पाहिजे. भाकरी फुगली की करणारा खूश नि खाणारा खूश. 
बऱ्यापैकी विचार केल्यावर कळलं भाकरीच्या पिठाचा दर्जा आणि ताजेपणा या दोन गोष्टींवर भाकरी फुलणे आणि तिची चव अवलंबून असते. ताजं पीठ असेल तर भाकरीला विरी जात नाही म्हणजे कडांना फटी पडत नाहीत आणि भाकरी फुलते. पण जरा शिळं झालं पीठ वा त्यात भेसळ असली की फटी पडायला लागतात, भाकरीचे तुकडे पडायला लागतात. इतकी तंत्र पोळी करताना का नाही सांभाळावी लागत? तर गव्हाच्या पीठात ग्लुटेन असतं त्याने चिकटपणा येतो. पण तांदूळ ग्लुटेन फ्री असतात आणि ज्वारी बाजरीत देखील ग्लुटेन कमी असतं त्यामुळे चिकटपणा कमी असतो. म्हणून ग्लुटेन इंटोलरेन्ट लोकांना तांदूळ वा इतर धान्यापासून केलेली भाकरी ब्रेड खायला सांगतात.
 भाकरी ही एका धान्यापासून करता येते आणि मल्टीग्रेन पण करता येते. तांदळाच्या भाकऱ्या उकड काढून केल्या तर अधिक अलवार होतात. कर्नाटकात याला अक्की रोटी म्हणतात. त्यात जिरं, मिरची कोथिंबीर घालुन केली की तिची चव निवगऱ्यांसारखी लागते. बाजरीची तीळ लावलेली भाकरी खास भोगीला करतात. ज्वारीची भाकरी उष्णप्रकृतीच्या माणसांनी खावी, उन्हाळ्यात खावी असे म्हणतात, तेच नाचणीच्या भाकरीबाबत.  माळवा प्रांतात म्हणजे मध्यप्रदेशात खांडवा गहू चांगला मिळतो. तिकडे जाड कणकीची थापून भाकरी करतात आणि कोळशाच्या शेगड़ीवर भाजतात. याला गाकर किंवा चांदक्या म्हणतात. तूप गूळासोबत खातात.
व्हिडिओ पाहून थियरी कळली तरी भाकरी करण्यात मी एकदमच नवशिकी होते. म्हणजे कुणी पीठ तयार करून दिले तर नुसत्या थापायला काही नाही. पण सगळे एकटीने करून न  जाळता भाकरी फुगली पाहिजे असा आग्रह असेल तर त्यासाठी मी स्वत:चे एक प्रमाण तयार केले जे कोणत्याही ऋतूत अपायकारक ठरणार नाही. एक भांडे ज्वारी पीठ असेल तर त्यात दोन चमचे बाजरी आणि दोन चमचे तांदूळाचे पीठ घालायचे. हवे तर थोडे मीठ आणि जरासे तेल वा तूप हाताने कोरड्या पीठात मिसळायचे आणि वरून उकळते पाणी ओतायचे. हाताशी थोडे गार पाणी ठेवायचे. आणि मग गरमागरम पीठ मळायचे. मध्ये हाताला थोडे गार पाणी लावायचे म्हणजे हात भाजत नाही. मग मस्त मळून भाकरी थापायला पोळपाटावर घ्यायची आणि तांदळाच्या पीठावर भाकरी थापायची. मोदक पीठ वा तांदळाच्या पीठाला एक खरखरीतपणा असतो त्याने भाकरी फिरवायला सोपी पडते. कडेने पातळ आणि मध्ये थोडी जाड ठेवायची. तव्यावर घालूताना जो भाग पोळपाटावर होता तो वर येईल अशी घालायची. लागलेले पीठ काढून पाणी लावायचे. पाणी वाळले की उलट करायची गॅस मोठा करायचा आणि जरा डाग पडू द्यायचे. मग परत उलट करून सरळ विस्तवावर टाकायची आणि मस्त फुगु द्यायची. आणि एखाद्या जाळीवर ठेवायची, थंड करून डब्यात ठेवायची किंवा तव्यावरून सरळ पानात ठेवायची. वर तूप वा घरचे लोणी म्हणजे आनंदाचे डोही आनंद तरंग. 
सध्या टेस्ट फॉर लाइफ ची छान प्रॉडक्ट्स मला ठाण्यात मिळू लागली आहेत, फोटोसकट येथे टाकते. वर फोन नंबर आहेच.