Friday, October 21, 2016

ऊन ऊन खिचड़ी



ऊन ऊन खिचड़ी साजुकसं तूप।              
वेगळं व्हायचं भारीच सुख!!
खिचड़ी पानात पडली की मला ही कविता नेहेमी आठवते. अगदी सुरुवातीच्या संसारात दोघानी मिळून केलेली  ती खिचड़ी पण पंचपक्वान्नाएवढी सुरेख लागते. मग कधी सोय म्हणून, कधी वेळ नाही, घरात काही आणलेलं नाही, बाळासाठी म्हणून खिचड़ी बनतच रहाते.

खरं तर साधी डाळ तांदळाची खिचड़ी! महाराष्ट्रातच तिचे किती प्रकार? मुंबई पुण्याकड़े मूग डाळ घालून बनते तर विदर्भात तूरडाळ घालून, वर मस्त चर्रर वाजणारी लसणाची फोडणी, तीच रेस्टोरेन्टमध्ये दाल खिचड़ा म्हणून समोर येते तर दाक्षिणात्यांकड़े वेन पोंगल.

काय एवढं वैशिष्ट्य या खिचडीचं? एक तर वन डिश मिल  आहे. शुद्ध मराठीत सांगायचे तर एका पातेल्यातला पदार्थ. झटपट होतो, भाज्या घालून पौष्टिक करता येतो, नसल्या तरी मस्तच लागतो. याचा जवळचा भाऊ म्हणजे मसालेभात. ज़रा काजू, शेंगदाणे, चिंच, गूळ, खोबरं यांचा नखरा. बाकी जिरे राइस वगैरे प्रकार करायचे तर सोबत आणखी तोड़ीलावणं करायला हवं. 



मागे एकदा रेचल रे चा 30 minutes meal नावाचा शो पहात होते. त्या दिवशीचा विषय होता 30 मिनिटात आणि फक्त 10 $ मध्ये जेवण तयार करायचे. त्यात तिने रिसोटो दाखवला होता. ज़रा बुटका तांदूळ EVOO extra virgin olive oil  वर भाजायचा आणि भाज्या वगैरे घालून भात करायचा. फ़क्त हे लोक यात साधं पाणी घालत नाहीत. थोड़ी वाइन घालून शिजवतात मग वेजिटेबल स्टॉक आणि भाज्या घालतात. वीकडे क्विक डिनर! 

नॉर्थ अफ्रीकन लोक कुस्कुस नावाचा पदार्थ करतात. रव्यापासून छोटे गोळे तयार केलेले मिळतात. त्याचा भात किंवा उपमा वा खिचड़ी म्हणता येईल.

सप्ताहातले पाच दिवस कामावरून आले की चटकन बनणारे काही तरी हवे. त्यामुळे असे अनेक एका पातेल्यातले पदार्थ  देशोदेशी केले जातात. सोबत सैलड, सूप, फ्लेवर्ड वा साधे दही वा रायते, कधी चिप्स, पापड़ इत्यादी. पण बाकीचे पुरवणी पदार्थ. मुख्य पदार्थ तांदळाचे! पोटभरीचे!

हा बेत छान लागतो एकूण

मिश्राडाळ खिचड़ी आणि दह्यातले रायते

एक वाटी तांदूळ आणि एक वाटी मिश्र डाळी घ्या. तूरडाळ पाऊण वाटी आणि मूग, मसूर, चणा डाळ घालून वाटी भरा. मग साधारण तीन चार वाटया पाणी घालून कुकरच्या तीन शिट्या करा. दुसऱ्या प्रेशर पॅनमध्ये तेल गरम करून मोहरीची फोडणी करा. त्यात हळद, कोथिंबीर, तीन चार लसणीच्या पाकळ्या, आले यांचे तुकडे, कांदा घालून परता. त्यात गालाजी खिचड़ी मसाला, किचन किंग मसाला घाला. मग वाटणे, गाजर, फ्लॉवर यांचे तुकडे घाला. मग मीठ घालून शिजवलेले डाळ, तांदूळ घाला. त्यात दोन वाटया पाणी, थोड़े तिखट, मीठ, मिरपूड, दालचीनी पूड घाला आणि एक शिट्टी करा. गरम खिचड़ी रायत्याबरोबर सर्व करा.

रायत्यासाठी काकड़ी, टोमॅटो, कांदा, चिरून त्यात मीठ , साखर आणि गालाजी छास मसाला घाला.

No comments:

Post a Comment